महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा कायम ! १८ जून ते २ जुलै दरम्यानमान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

Foto
पुणे : एकीकडे देशभरात अल निनोमुळे धास्ती वाढली असतानाच आता मान्सूनबाबतची अपडेट समोर आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १८ जून ते २ जुलै या काळात महाराष्ट्रासह दक्षिण आणि मध्य भारतातील काही भागांमध्ये मान्सून  सक्रिय होऊ शकतो. या काळात कोकणसह राज्यातील बहुतांश भागांमध्ये मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता असून काही भागांमध्ये २४ ते ४८ तासांत उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानुसार, १४ जून रोजी नैऋत्य १ मान्सूनची उत्तर मर्यादा हर्णे, सोलापूर, हैदराबाद, भद्राद्री कोठागुडेम, कलिंगपट्टणम, पारादीप, बारिपाडा, पुरुलिया, धनबाद, मुझफ्फरपूर मार्गे पुढे सरकलेली असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार-पाच दिवसांत महाराष्ट्रातील आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार व दक्षिण छत्तीसगडच्या काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर  १८ जून ते २ जुलै दरम्यान महाराष्ट्र, दक्षिण भारत व मध्य भारताच्या काही भागांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.

प्रशांत महासागरातील एल निनोचा प्रभाव व अफगाणिस्तानकडून येणार्‍या गरम व कोरड्या वार्‍यांमुळे मान्सूनची वाटचाल रोखली गेली असून, मान्सून सध्या रत्नागिरीमध्येच रेंगाळला आहे. या कोरड्या वार्‍याचा प्रभाव कमी झाला की मान्सूनच्या पुढील प्रवासाला सुरुवात होणार आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सून दाखल होण्यासाठी आता थेट  १८ जून ते २ जुलै दरम्यान महाराष्ट्र, दक्षिण भारत व मध्य भारताच्या काही भागांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.

मान्सूनच्या वाटेत नवे संकट? 
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मान्सून अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. अशा परिस्थितीत एल निनोची तीव्रता वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. हवामान अभ्यासकांच्या मते, याचा परिणाम पावसाच्या वितरणावर होऊ शकतो. काही भागांमध्ये पावसाचे आगमन उशिरा होण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यवृष्टी होऊ शकते. दुसरीकडे, काही भागांना अल्प कालावधीत अतिवृष्टीचाही सामना करावा लागू शकतो. पावसातील हा असमतोल विशेषतः कृषी क्षेत्रासाठी आव्हानात्मक ठरू शकतो. याशिवाय, एल निनोच्या प्रभावामुळे जागतिक स्तरावर तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

जुनचा अर्धा महिना सरला, शेतकर्‍यांची धाकधुक वाढली..
जून महिन्याचा अर्धा टप्पा संपला, पण अद्यापही अनेक भागांत पावसाने पाठ फिरवल्याचं चित्र आहे. खरीप हंगामाच्या आशेवर असलेल्या शेतकर्‍यांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे, शेतकर्‍यांनी बी-बियाणे, खत  खरेदी करून शेतीची तयारी पूर्ण केली आहे, मात्र आभाळाकडे लागलेले डोळे अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दररोज ढगांची चाहूल लागते, पण पावसाचे थेंब मात्र जमिनीवर पडत नाहीत. पेरणीची योग्य वेळ हातातून निसटत असल्याने शेतकर्‍यांच्या मनात धाकधूक वाढली आहे. वर्षभराच्या उदरनिर्वाहाची आशा असलेला खरीप हंगाम आता पावसावरच अवलंबून असून, शिवारात शांतता आणि शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर चिंता दिसून येत आहे.